पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त
चिंचणी, धुमाळवाडी, निर्वी गावातील शेती व्यवसाय धोक्यात
शिरुर ama9
शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील शिरसगांव काटा सबस्टेशनच्या अखत्यारीत येणा-या चिंचणी, धुमाळवाडी, निर्वी गावांना विजेच्या होणा-या वारंवार खंडीत विज पुरवठया मुळे शेतीचे नुकसान होत असुन येत्या आठ दिवसांमध्ये विजेच्या या परिस्थितीतवर सुधारणा करुन सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख अनिल पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
या संदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता संदीप दरवडे महावितरण विभागीय कार्यालय केडगांव यांना दिले आहे . या वेळी तालुका सल्लागार संतोष काळे ,शाखा प्रमुख आबासाहेब काळे ,भरत पवार ,जितेंद्र जेउघाले आदी उपस्थित होते .
या निवेदनात म्हटले आहे कि केडगांव विभागाचे अखत्यारीत येणारे सबस्टेशन शिरसगांव काटा, ता. शिरुर येथून विज पुरवठा खंडीत स्वरुपात येत आहे. शेतक-यांना आपण दिवसपाळी व रात्रपाळी असे विभागून आठ तास लाईट पुरवठा करतो. या आठ तासामध्येही अर्धा तास विज सुरळीत चालते तर पंधरा मिनीटे पुन्हा गायब होते. यामुळे मोटरीचे पाणी शेतात येईपर्यंत पुन्हा विज बंद होते. त्यामुळे शेतकरी खूप हवालदिल आणि संतप्त झाला आहे.
या भागामध्ये नदी परिसर आणि ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबटयांचे हल्ले पाळीव प्राण्यांवर मोठया प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये शेतक-यांना रात्रपाळीमध्ये जीव मुठीत धरुन पिकांस पाणी देण्यासाठी जावे लागते परंतू शेतात कांदयाचे चार सारे पूर्ण होण्या अगोदर विज पुन्हा गायब होते.या भागातील साखर कारखाना शासनाच्या पक्षपाती धोरणामुळे यंदा बंद पडला असले कारणाने शेतक-यांना ऊस घालवण्यासाठी पराकाष्टा करावी लागली आहे. ऊस उशिरा जात असलेमुळे कांदा पिक व गहू पिकांची लागवड उशिरा झाली आहे. त्यातून विजेचा असा लपंडाव होत असलेने जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे .
केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्या मुळे कांदा पिकास कवडीमोल बाजार मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. महाराष्ट्रात या अगोदर विदर्भ, मराठवाडा या भागात शेतकरी आत्महत्या करत होते. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रातही त्याचे प्रमाण वाढू लागले आहे.तरी आठ दिवसांमध्ये विजेच्या या परिस्थितीतवर सुधारणा करुन सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .


