महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत चेतन दत्तात्रय बर्गे यांचे यश

शिरूर
शिरूर शहरातील चेतन दत्तात्रय बर्गे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक (Industry Inspector) परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत शिरूरचे नाव अभिमानाने उंचावले आहे.चेतन बर्गे हे शिरूर नगरपालिका येथे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांचे चिरंजीव आहेत.

चेतन यांचे प्राथमिक शिक्षण जीवन विकास मंदिर, शिरूर, तर माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे झाले. पुढे अभियंता होण्याच्या ध्येयाने त्यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव, पुणे येथून पदवी पूर्ण केली. अभियांत्रिकीच्या अभ्यासासोबतच त्यांनी राज्यसेवेची तयारी सुरू ठेवली. मर्यादित साधनसामग्री, नोकरी–अभ्यास यांचा समतोल आणि कठोर दिनक्रम या सगळ्यांचा सामना करत त्यांनी हे यश मिळवले.शिक्षण, शिस्त आणि कष्ट यांची प्रेरणा घरातूनच मिळाल्याचे चेतन यांनी आवर्जून सांगितले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना करिअरचा इतर पर्याय तयार ठेवावा असे सांगून ग्रामीण भागातील मुलेही स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकतात. अभ्यासाचे योग्य नियोजन व शिस्त ही यशासाठी महत्त्वाचे असल्याचे चेतन यांनी सांगितले.
.

“नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि लक्ष्यावर अढळ विश्वास ठेवला तर कोणताही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो,” असा संदेश त्यांनी दिला.
शिरूरसारख्या वाढत्या औद्योगिक परिसरातील तरुणांना उद्योग क्षेत्रातील प्रशासनात काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारे हे यश ठरले आहे. शिरूरमधील चेतन यांचे मित्रपरिवार आणि शिक्षक ग्रामस्थांनी चेतन यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.


