शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत नाथाभाऊंचे वनमंत्र्यांना निवेदन

शिरूर प्रतिनिधी
जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यासंबंधी उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले. शिरूर तालुक्यासह परिसरात बिबट्यांच्या मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.
मागच्या १५ दिवसांत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील शिवण्या बोंबे या बालिकेचा आणि भागुबाई जाधव या आजींचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे नाथाभाऊंनी या निवेदनाद्वारे वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गेल्या ५ वर्षांमध्ये बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि १५ हजारहून अधिक पशुधनाची हानी झाली असून यामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनांमुळे शिरूर तालुक्यासह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. तरी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधितांस बैठकीचे आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे नाथाभाऊंनी वनमंत्र्यांकडे केली.


