जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी भवनातून मिळणार एकाच छताखाली सुविधा
मांजरी: औंध येथे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी दिव्यांग
भवन उभे करण्यात येणार आहे. या महिनाखेरपर्यंत या कामाला गती मिळेल. या
भवनामुळे एकाच छताखाली दिव्यांगांना सर्व सुविधा मिळण्यास मोठी मदत होईल,
अशी माहिती जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी
दिली. येथील जनाधार दिव्यांग चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक दिव्यांग
दिनानिमित्त दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले
होते. तसेच दिव्यंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या सागर पुजारी, प्रविण
डिंबळे, ज्योतीराम यादव, धर्मेंद्र सातव, अनिल दाईंगडे या दिव्यांगांचा
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विशेष
गौरव करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननावरे यांनी प्रास्ताविक केले.
दिलिप घुले, गोपाळराव म्हस्के, जितीन कांबळे, अमित घुले, निलेश घुले, अजित
घुले, सुमित घुले, ज्ञानेश्वर घुले, कैलास घुले, स्वप्निल उंद्रे, बालाजी
अंकुशराव, शैलेंद्र बेल्हेकर, प्रा. सुवर्णा गोऱ्हे, अमोल भोसले आदी यावेळी
उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद म्हणाले, “दिव्यांग भवनात
दिव्यांगांच्या बावीस पैकी सोळा प्रकारच्या दिव्यांगांना विशेषत: लहान
मुलांना उपचाराच्या सुविधेसह इतर सर्व प्रकारच्या सुविधा व सरकारी योजनांचा
लाभ घेता येणार आहे. दिव्यंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देवून अनेक व्यक्ती
खऱ्या दिव्यंगांवर अन्याय करीत आहेत. जिल्ह्यात अशी छप्पन प्रकरणे समोर आली
आहेत. त्यांची चौकशी होऊन योग्य कारवाई केली जाईल. त्यातून खऱ्या
दिव्यांगांना न्याय देता येईल.’