शिरूर तालुका
रांजणगाव पोलिसांचा संजय पाचंगे यांच्याकडून सत्कार ,पोलिसांच्या कार्यतत्परतेची दखल घेत फेटा बांधून केले कौतुक
शिरूर ama9 वृत्तसेवा रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांच्या गाडीचा पाठलाग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून कार्यतत्परता दाखवत पाचंगे यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा तसेच पत्रकार शेरखान शेख, सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांचा पोलीस ठाण्यातच पाचंगे यांनी फेटा बांधुन सत्कार केला. यावेळी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या सहित अनेक कर्मचारी उपस्थित होते.
सोमवार (दि. ३) रोजी चारचाकी वाहनातून दोन अज्ञात व्यक्ती रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत संजय पाचंगे यांचा पाठलाग करत असल्याचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पत्रकार शेरखान शेख यांना कळविले शेरखान शेख यांनी तातडीने रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना कळवले होते त्यानंतर तात्काळ रांजणगाव पोलिसांनी दहा मिनिटांतच पाचंगे यांना पोलीस संरक्षण पुरवले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संजय पाचंगे यांच्याशी त्या आरोपींचा कसलाच संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे पाचंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रांजणगाव पोलिसांचे जाहीर आभार मानत कौतुक केले होते.
गुरुवार (दि. ६) रोजी संजय पाचंगे यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षण बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार मुस्ताक शेख, दत्तात्रय शिंदे, सुभाष गारे, पोलीस हवालदार सुनील नरके, संतोष औटी, ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, पोलीस नाईक पांडुरंग साबळे या सर्वाना फेटा बांधुन सत्कार करत आभार व्यक्त केले. गुरुवार (दि. ६) रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संभाजी गोरडे, पोपट पाचंगे, तेजस फडके, शेरखान शेख, प्रमोल कुसेकर यांचाही पाचंगे यांनी पोलीस ठाण्यात फेटा बांधुन सत्कार केला. तसेच पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचाही फेटा बांधुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष आणि क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, वर्षा काळे, मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे प्रभारी तुळशीदास दुन्डे, भाजपा अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष राजू शेख, प्रदेश अल्पसंख्यानक प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलावर शेख, कामगार आघाडीचे कार्यकारणी सदस्य मयूर गावडे व मान्यवर उपस्थित होते.



