शिरूर तालुका
आमदार ॲड अशोक पवार यांना आलेल्या धमकीच्या निनावी पत्राची एस आय टी मार्फत चौकशी करावी – मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांची पुणे जिल्हा ग्रामीण अधिक्षकांकडे मागणी
शिरूर ama9 वृत्तसेवा
ऑक्टोबर महिन्यात शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांना जिवे मारण्याची धमकी निवावी पत्राद्वारे देण्यात आली होती.या पत्रानंतर शिरूर हवेलीत एकच खळबळ उडाल्यानंतर शिरूर शहरात सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चा मध्ये सर्व पक्षाचे प्रमुख नेते सामील झाले होते.मात्र या घटनेला जवळपास चार महिने उलटूनही अद्यापपर्यंत या पत्रामागील मास्टरमाईंड उघड न झाल्याने व राजकीय वर्तुळातुनही चुपकी साधली गेल्याने या प्रकरणातील गुढ कायम असुन या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी मनसे शिरूर शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी पुणे जिल्हा ग्रामीण अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे . या निवेदनात म्हटले आहे कि दरम्यानचे काळात महाराष्ट्रात अनेक लोकप्रतिनिधी यांना देखील निनावी पत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या आलेल्या होत्या. त्यामुळे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपा चे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सदरचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले होते की सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निनावी पत्राद्वारे आलेल्या धमक्यांची व बदनामीची एस. आय. टी. मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा विधानसभेत केलेली होती. त्यामुळे दि. १७/१०/२०२१ रोजी शिरूर येथील आमदार अशोक पवार व काही लोकांना आलेल्या निनावी पत्राची देखील चौकशी एस. आय. टी. मार्फत करून ते विकृत कृत्य करणाऱ्या लोकांचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. व सदर तपासात निष्पन्न झालेल्या गुन्हेगारांची नावे व सदरकामी केलेल्या तपासाची माहिती शिरुर शहरातील नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.सदर पत्रातील आरोपी यांचा शोध घेउन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांची नावे उघड करावी अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करू असा इशाराही या निवेदनात करण्यात आला आहे .
आगामी काळातील निवडणुक पूर्वी खऱ्या सुत्रधाराचा शोध लागणे गरजेचे आहे . कुठलाही आरोपी निष्पन्न न झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांना “तुमचा महेंद्र मल्लाव होईल” अशी धमकी निनावी पत्राद्वारे शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांना पाठविण्यात आली. पत्रारामध्ये आमदार अशोक पवार यांना धमकी बरोबर शहरातील काही राजकीय पक्षातील प्रमुखानबद्द्ल तसेच काही प्रतिष्ठित नागरिकांनबद्द्ल आक्षेपार्ह लिहण्यात आले होते . त्या मुळे या सर्व गोष्टीचा छडा लागणे गरजेचेआहे . हे प्रकरण इथे न थांबता “या पत्रामागे बोलविता धनी कोण”याचा शोध घेणे गरजेचे असताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना व आमदार ही त्याच पक्षाचे असताना देखील जवळपास चार महिनने उलटून ही अद्यापपर्यंत या पत्रामागे कोण आहे याचा शोध घेणे पोलिसांना घेणे शक्य झाले नाही.मात्र त्या नंतर हे प्रकरण थंड झाले.एवढ्या एका निनावी पत्राच्या तपासाला चार महिने कसे लागतात याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.एवढी गंभीर घटना घडत असताना पोलिस यंत्रणा एवढी शांत का असा प्रश्न सुद्धा नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून काही प्रतिष्ठीत व राजकीय पदाधिकार्यांची चौकशी या पत्रसंदर्भात झाली असल्याची शिरूर शहरात दबक्या आवाजात चर्चा आहे.या नागरिकांची चौकशी झाली असेल तर या चौकशीतून काय निष्पन्न झाले हे पुढे येणे गरजेचे असून या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण ? या सारखा प्रश्न नागरिकांना वारंवार पडत राहील.नाहीतर हा राजकीय स्टंट होता का असे नागरिकांना नेहमीच वाटत राहील.
या घटनेनंतर आमदार अशोक पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आणि नगरपालिका सभागृह नेते प्रकाश धरिवाल हे शिरूर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करत आहोत ते काहीजणांना खुपत असून त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगितले होते.मात्र नेमके हे लोक कोण पक्षातील विरोधक की विरोधी पक्षाचे पदाधिकारी का शहरातील प्रतिष्ठित लोक या बाबत उलगडा होणे गरजेचे आहे.कारण ही घटना साधीसुधी नसून याबाबत पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या पत्राच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेणे गरजेचे आहे.
चौकट
सदर निनावी पत्र लिहिणाऱ्याची नावे जाहीर न झाल्यास उपोषणाचा इशारा मनसेचे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी ama9 शी बोलताना दिला . या पत्रामध्ये माझ्या बरोबर काही लोकांची बदनामी करण्यात आली असुन त्यांनी ते केलेले आरोप सिध्द करावे अन्यथा नावे जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अविनाश घोगरे यांनी ama9 शी बोलताना सांगितले .



