शिरूर तालुका
पुणे जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून बोलेरो आणि पिकपचा वापर करून एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद
शिरुर ama9 वृत्तसेवा स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणने बोलेरो आणि पिकपचा वापर करून एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली असून या प्रकरणी
बनवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना, वय 34 वर्षे, व्यवसाय- रॉयल हॉटेल, सध्या रा. कारेगाव ता. शिरूर जि .पुणे, मूळ रा. पाचार, ता. दातारामगड, जि सिखर राज्य राजस्थान, बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी, वय 30 वर्षे, सध्या रा, कारेगाव रॉयल हॉटेल, ता शिरूर जि पुणे, मूळ रा करड, ता दातारामगड,जि सिखर, राज्य राजस्थान याना अटक करण्यात आली असून यांचेकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुर्टी ,ता.बारामती जि.पुणे येथील नीरा-मोरगाव रोडवर असलेल्या टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन १६ जानेवारी २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेऊन एकूण 4,11,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाकडून चालु होता. तपासात गुन्ह्यामध्ये पांढरे रंगाचे बोलेरो चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले होते . बोलेरो गाडीचा मागोवा घेत रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले . फुटेज च्या आधारावर बोलेरो गाडीची काही ठळक वैशिष्ठ्ये शोधून रस्त्यांवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करत असताना बोलेरो गाडी ही कारेगाव, ता. शिरूर जि पुणे परिसरात आल्याचे दिसून आले होते .
तपास पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांचे मदतीने कारेगाव परिसरात बोलरोचा शोध सुरू केला. त्या दरम्यान तपास पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील एटीएम चोरीतील आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबूलाल उर्फ पप्पू चौधरी याचे सोबत गुन्हयातील संशयित बोलेरो गाडीचा वापर करत आहेत. या माहितीच्या आधारे २ फेबृवारी 2022 रोजी कारेगाव परिसरात सापळा लावून त्याना पकडले . त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असलेचे निष्पन्न झाले. त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांनी बोलेरो गाडीचा वापर करून जवळा, ता. पारनेर ,जि. अहमदनगर येथील एटीएम मशीन चोरी केले असल्याचे सांगितले असून बोलेरो गाडीची कागदपत्रे त्यांचे जवळ उपलब्ध नसल्याने गाडीची माहिती घेतली असता तोफखाना पोलीस स्टेशन येथे सदरची बोलेरो गाडी चोरी गेलेबाबत फिर्याद दाखल असल्याचे समजले आहे. या आरोपीनी लोणी व्यंकनाथ परिसरात पिकअप गाडीचा वापर करून एटीएम चोरण्याचा प्रयत्न केला असून नगर-मनमाड रोडवरील गरवारे चौक परिसरात देखील पिकअप गाडीचा वापर करून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी त्याठिकाणी पिकअप गाडी सोडणेत आली असल्याचे आरोपींनी सांगितले .
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे, सहा.फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार रविराज कोकरे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,पोलिस हवालदार राजु मोमीन ,अजित भुजबळ,अभिजित एकशिंगे,मंगेश थिगळे,स्वप्नील अहिवळे,योगेश नागरगोजे यांना नेमले होते.तसेच तपसदरम्यान दरम्यान वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलिस उपनिरीक्षक गणेश कवितके,पोलिस कॉन्स्टेबल अमोल भुजबळ यांचे पथकाने देखील तपास पथकाला मदत केली आहे.
फोटो ओळी
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणने बोलेरो आणि पिकपचा वापर करून एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली .



