शिरूर तालुका

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषदा निवडणुकीसाठी तालुक्यात महाविकास आघाडी होणार कि स्वतंत्र लढणार या कडे सर्वांचे लक्ष

शिरूर (ama9  वृत्तसेवा) : आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व शिरूर नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाउगर्दी  मोठ्या प्रमाणावर वाढली असून मात्र शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस अशी महाआघाडी होणार का याबाबत प्रश्नचिन्ह उभे असून राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत फारसे सख्य नाही.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट असून त्यातील सहा जागेवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले आहेत.तर एकाजागी लोकशाही क्रांती आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.पंचायत समितीत १४ जागा असून त्यात राष्ट्रवादी ९,भाजप ३,शिवसेना १,लोकशाही क्रांती आघाडी१, असे बलाबल होते.पंचायत समिती वर राष्ट्रवादीची सत्ता असून आमदार अशोक पवार यांचा वरचष्मा मागील निवडणुकीत दिसून आला.या पुनर्रचनेत तालुक्यात एक गट वाढणार असून तर पंचायत समिती चे दोन गण वाढणार आहेत.भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे दोन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.त्यामुळे भाजप कडे पाचर्णे यांच्या तोडी चा नेता  नसल्याने भारतीय जनता पार्टी ला त्यांची उणीव भासणार आहे.भारतीय जनता पार्टी कडे ठोस चेहरा नसल्याने मतदार सध्यातरी संभ्रमावस्थेत आहेत.नुकत्याच झालेल्या तालुक्यात सोसायट्यांच्या निवडणुकीत भाजपने प्रमुख नेत्यांच्या गावातील सोसायट्या मध्ये विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.तर राष्ट्रवादीकडे तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्था ताब्यात असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे.तसेच तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख व आमदार अशोक पवार यांच्यात शीतयुद्ध असल्याने शिवसेना पदाधिकारी एकाबाजूला तर तालुकाप्रमुख एका बाजूला अशी अवस्था आहे.त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे तालुक्यात आघाडी होईल का नाही या बाबत प्रश्नचिन्ह असुन शिवसेना भाजप बरोबर जाईल याबाबत आगामी काळात उत्तर मिळेल.
 तसेच शिरूर नगर परिषदेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्या पक्षाच्या समोर उमेदवार निवडीचे आव्हान असणार आहे.प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली सन २००७ पासून शिरूर नगरपरिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे.शिरूर नगरपरिषद मध्ये सध्या एकूण १० प्रभागातून २१ नगरसेवक निवडून आले होते तर सुधारित वॉर्ड रचनेनुसार १२ प्रभागातून २४ नगरसेवक निवडून जानार आहेत.सध्या नगराध्यक्ष हे नागरिकांमधून निवडून आले होते. मात्र यावेळेस नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधून निवडून येणार आहे.
मागील २०१६ च्या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्याने त्यांनी नगरपरिषदेत चंचुप्रवेश केला होता.मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी चे आमदार,खासदार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.शिरूर शहर विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आदी पक्षांचा समवेश आहे.मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादी कडे इच्छुकांची संख्या जास्त झाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार विकास आघाडी कडून लढणार की स्वतंत्र पॅनल टाकून लढणार याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.तसेच शिवसेना काँग्रेस यांना आघाडीत किती स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे आहे.भाजप,लोकशाही क्रांती आघाडी,वंचित बहुजन आघाडी, मनसे आदी पक्षांची सुद्धा ताकद शिरूर शहरात चांगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button